पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पंतप्रधानपदी तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचे आहे. अशी मोठी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. ते पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत बोलत होते.
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षानी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. निवडणूकींच्या या वातावरणात आता आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात सुद्धा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवार यांना मुख्यमंत्री पदी बघण्याची मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
अमोल कोल्हे हे पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेच्या आढावा बैठकीत उपस्थीत होते त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या अजित दादांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता ऋण फेडण्याची वेळ आली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची फळी, नेत्यांची मोट बांधून झुंजार अन् लढाऊ वृत्ती आपण दाखवून दिली पाहिजे.
माझ्यासाठी तुम्ही जीवाचे रान केले, माझ्यासाठी पायाला भिंगरी लावून पळालात. आता तुमच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणे गरजेचे आहे. शरद पवारांना पंतप्रधान, तर अजित दादांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघायचे आहे. असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.