नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला खाल मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर स्पष्ट्पणे मत मांडले आहे. यावेळी त्यांनी ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी कोणतीही स्पर्धा किंवा आव्हान नाही. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनापासून पाठिंबा देत आहे, असे स्पष्ट मत शहा यांनी व्यक्त केले.
Interview to @ANI. https://t.co/CQtweZaQQH
— Amit Shah (@AmitShah) February 14, 2023
विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी 2024 च्या निवडणुकीत देशातील जनता भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष ठरवेल, असे स्पष्ट केले. केंद्राच्या पुढाकारामुळं तळागाळातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचंही शहांनी सांगितलं. काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले, त्यांनी (काँग्रेस) कदाचित मतदानापूर्वी राज्यांमध्ये प्रचार केला नसेल. परंतु त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीच्या निकालांवरून विरोधी पक्षाची ताकद दिसून येईल. ज्या राज्यात एकेकाळी त्यांची सत्ता होती. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह यंदाच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही शहांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्यांनी, आज भारतानं आपल्या कामगिरीमुळं जगभरात ओळख निर्माण केलीये. आठ वर्षांच्या अल्प कालावधीत आम्ही देशातील 60 कोटी गरीब लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यात यशस्वीही झालो. आम्ही खूप काही साध्य केलं. रेल्वेमध्ये मोठे बदल झाले आहेत, अंतराळ क्षेत्रात नवीन धोरण आणलं आहे आणि आम्ही या क्षेत्रात अग्रेसर होण्याची तयारी करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.