कोलकाता : सुधारीत नागरिकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) यांच्या विरोधात बंगालमध्ये आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकात्यात दोन दिवासांच्या दौऱ्यावर येत आहेत. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी यांचा प. बंगालचा पहिलाच दौरा आहे. दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या आज आणि उद्या होणाऱ्या भेटीसाठी मी उत्सुक आहे. स्वामी विवेकानंद यांची जयंती असताना रामकृष्ण मिशनमध्ये वेळ घालवता येणार असल्याने मी आनंदी आहे. हे माझ्यासाठी खास ठिकाण आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
आता त्यात एक खंतही असेल! जनसेवा हीच प्रभूसेवा ही ही वैश्विक शिकवण मला ज्यांनी दिली ते पुजनीय स्वामी अत्मस्थानंदजी तेथे नसतील. मी रामकृष्ण मिशनमध्ये जातोय आणि तेथे त्यांचे पवित्र अस्तीत्व नाही, हे कल्पनेच्या पलिकडचे आहे, असेही मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर ममता आणि मोदी यांनी एकाही व्यासपीटावर हजेरी लावलेली नाही. मात्र कोलकात्यात उद्या होणाऱ्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एका व्यासपीटावर येण्याची शक्यता आहे.