“तानाजी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करा”

शिवसैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावंत यांनी शिवसेनेविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिक सावंत यांच्याविरोधात गेले आहेत. दरम्यान, आज दुपारी सोलापूर आणि उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांची मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे परंतु, या बैठकीस तानाजी सावंत गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी सावंतांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी लावून धरल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीनंतर तानाजी सावंत यांनी आपली नाराजी उघउ केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेतही बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली होती. यासर्व घटनांचा विचार करता शिवसैनिकांमध्ये तानाजी सावंत यांच्याविषयी नाराजी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळीदेखील तानाजी सावंत यांनी दांडी मारली होती तसेच त्यांचे मुख्यमंत्र्यांसोबतही चांगलेच खटके उडाले होते. त्यामुळे सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीनंतर तानाजी सावंत यांच्याविषयीचा निर्णय घेण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.