वॉशिंग्टन – युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. रशियाकडून हल्ल्याच्या भीतीने बायडेन सरकारचा हा इशारा दिल्याचे बोलले जात आहे. जो बायडेन म्हणाले, आता परिस्थिती खूप वेगळी आहे आणि ती खूप वेगाने बदलत आहे. याआधीही रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असा दावा अमेरिकेने केला होता. तसेच, बायडेन यांनी यापूर्वी मॉस्कोला संभाव्य लष्करी कारवाई संदर्भात इशारा दिला आहे. अमेरिकेने नाटो सहयोगींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना मॉस्कोमधील सात प्रमुख संघर्षांबाबत इशारा दिला आहे. एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बायडेन म्हणाले, अमेरिकन नागरिकांनी युक्रेनमधून तातडीने बाहेर पडले पाहिले. कारण देश सध्या जगातील सर्वात मोठ्या सैन्याचा सामना करत आहे. ही खूप वेगळी परिस्थिती आहे आणि परिस्थिती खूप वेगाने बिघडू शकते. युक्रेनवर आक्रमण झाल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेसह अनेक देशांनी दिला आहे.
क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक
युक्रेन, अफगाणिस्तानचे संकट आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता हस्तक्षेप या चिंतेच्या पार्श्वभूमीवर क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री आज मेलबर्नमध्ये एकत्र बैठक पार पडली. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॉरिस पायने यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्र मंत्री हयाशी योशिमासा हे उपस्थित होते.