पॅरिस – संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक एजन्सीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने त्यासाठी या संस्थेची देय असलेली 600 दशलक्ष डॉलरची रक्कमही देण्याची तयारी दर्शवली आहे.
युनेस्कोच्या धोरणात, विशेषत: जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान शिक्षणासाठी मानके ठरवण्यामध्ये चीनने प्रभाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेला चिंता निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांनी चीनला या संस्थेत अटकाव करण्यासाठी पुन्हा युनेस्कोचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझौले यांना युनेस्कोचे व्यवस्थापन आणि संसाधने विभागाचे उपसचिव रिचर्ड वर्मा यांनी अमेरिकेच्या सहभागाविषयीची कल्पना दिली. अझौले यांनी सोमवारी एका विशेष बैठकीत अमेरिकेच्या निर्णयाची माहिती राजदूतांना दिली.
युनेस्कोने 2011 मध्ये पॅलेस्टाईनचा या संघटनेत सदस्य राष्ट्र म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने या संस्थेला निधी देणे थांबवले होते. ट्रम्प प्रशासनाने 2017 मध्ये या एजन्सीमधून पूर्णपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.