ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘रुग्णवाहिका’ दर्जा

पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय समन्वय साधणार आहे. यासह ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे.

 

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयांतर्गत पथके नेमण्यात आली आहेत. सोमवारपासून या पथकांचे काम सुरू असून, पथकांतील अधिकारी ऑक्सिजनच्या निर्मिती संबंधित खासगी कंपन्या आणि वाहतूकदारांशी संपर्क साधत आहेत. सोमवारी चाकण आणि भोसरी एमआयडीसीमध्ये पथकांनी कंपन्यांशी संपर्क साधला आहे.

 

ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांची रचना देखील वेगळी असते. याशिवाय कार्यालयाकडे या वाहनांची वेगळ्या संवर्गात नोंद नसल्याने, वाहने शोधून संबंधित वाहतूकदार किंवा कंपनीपर्यंत पोहोचणे हे पथकांसाठी नवे आव्हान आहे.

सायरन बसवणार

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. अवजड वाहनांबाबतचे निर्बंध, टोलनाक्यावरील रांगा, वाहनांची गर्दी आदीमुळे वाहनांचा खोळंबा होऊ नये, यासाठी या वाहनांना रुग्णवाहिकांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे वाहनांना “सायरन’ बसवण्यात येईल. यामुळे “ग्रीन कॉरिडोर’प्रमाणे रस्ता मोकळा होवून ऑक्सिजन वाहतूक विनाअडथळा आणि विना विलंब होण्यास मदत होणार आहे.

रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. यासाठी नियंत्रण कक्ष तयार केले आहेत. ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने मर्यादित आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत येणार आहे. निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांबाबत तपशील घेण्याच्या सूचना पथकांना दिल्या आहेत.

– संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.