पिंपरी, (प्रतिनिधी) – घरगुती वापराच्या सिलेंडरमधून चोरून गॅस काढणाऱ्या एकास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील 16 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) दुपारी साडेबारा वाजता रामनगर, चिंचवड येथे करण्यात आली.
प्रदीप तुकाराम मगर (वय 40, रा. तापकीर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर अवसरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रदीप मगर याने घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरून काढला.
गॅस चोरी करत असताना त्याने ज्वालाग्राही पदार्थांबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा मारून कारवाई करत प्रदीप मगर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 16 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.