पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या प्रणालीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त आणि जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल, इतर अधिकारी उपस्थित होते. जम्बो सेंटर येथे अधिक संख्येने बेड सुसज्ज करावेत. यामुळे करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी होईल, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
शहरातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी जम्बो सेंटर लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, असे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले. पुणे महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करण्यात येत असून, आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.
येथील माहिती व्यवस्थापन प्रणालीमुळे रुग्णांना दाखल करून घेतल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. या व्यवस्थेसाठी “कमांड रुम’ तयार केली आहे. यापूर्वी अशी माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीयू आणि इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना आणि व्यवस्थापनाला पाहता येईल, असे अग्रवाल यांनी सांगितले.