पुणे – जम्बो कोविड सेंटर उभे करण्याच्या विषयात वादग्रस्त ठरलेल्या “लाइफलाइन’ एजन्सीचे डिपॉझिटचे 25 लाख रुपये महापालिकेने जप्त केले आहेत. या पैशांतूनच जम्बो कोविड सेंटरमधील काही सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत.
“लाइफलाइन’ एजन्सीने जम्बो कोविड सेंटरचे काहीच काम केले नाही. तसेच ती कंपनी बोगस निघाल्याने महापालिका प्रशासनाने हे काम दुसऱ्या एजन्सीला दिले. एजन्सीने खोटेपणा केल्याने त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यांच्याऐवजी “मेटाब्रो’ या एजन्सीला काम देण्यात आले. सध्या ही एजन्सी पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरचे व्यवस्थापन पहात आहे. दरम्यान, जप्त केलेल्या पैशांतून जम्बो कोविड सेंटरमधील डॅशबोर्डचे काम करून घेण्यात आले आहे. अन्य आणखी काही कामे त्यातून केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
ऍम्ब्युलन्स, शवदाहिनीची उपलब्धता या सगळ्यांचा “डॅशबोर्ड’ही महापालिकेने तयार करायला घेतला आहे. त्यातूनही नागरिकांना “लेटेस्ट’ माहिती उपलब्ध होणार आहे. याच धर्तीवर बाणेर येथील कोविड सेंटरचे व्यवस्थापनही उभे करण्यात येणार आहे.
असा असेल “डॅशबोर्ड’
जम्बो कोविड सेंटरमध्ये “डॅशबोर्ड’ बसवण्यात आला असून, त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीची तपशीलवार माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये रुग्णांचे पल्सरेट, ऑक्सिजन लेव्हल, अत्यवस्थ रुग्ण, निरीक्षणाखाली असलेले रुग्ण, संशयित रुग्ण आणि अन्य गोष्टींची माहिती या “डॅशबोर्ड’मधून समजणार आहे. या प्रणालीमुळे डॉक्टरांना “रिअल टाइम’ माहिती मिळू शकणार आहे. “डॅशबोर्ड’मुळे रुग्णांच्या बेड क्रमांकानुसार रुग्णाची सद्यस्थिती समजणार आहे. बेडला जोडलेल्या व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणांवरील माहितीही यातून समजणार आहे. ज्या रुग्णांची तब्येत अत्यवस्थ असेल, त्यांच्यापुढे लाल रंगाची पट्टी येते. त्यामुळे जे डॉक्टर शिफ्ट बदलल्यानंतर येतील त्यांना सर्वांत आधी या रुग्णांची तपासणी करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या जम्बो कोविड सेंटरमध्ये महापालिकेने सुरू केलेला हा डॅशबोर्ड डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी आहे.