नवी दिल्ली : काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजबाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच राजकीय भूकंप झाला आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटत आहे अशी भावना व्यक्त केली होती.
दरम्यान काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि गांधी कुटुंबाच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबिना सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.
अंबिका सोनी यांनी शनिवारी रात्री राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले पंजाबशी घट्ट नाते असून एका शीख व्यक्तीलाच राज्याचे प्रमुख बनवलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांनीही त्यांना समजावण्यासाठी बोलावले होते, पण आपल्याला खात्री नाही अशी गोष्ट स्वीकारणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधींनी अंबिका सोनी यांना १९६९ मध्ये पक्षात आणलं होतं. फाळणी झाली तेव्हा अंबिका सोनी यांचे वडील अमृतसरमध्ये जिल्हाधिकारी होते. त्यांनी नेहरुंसोबत जवळून काम केलं होतं. अंबिक सोनी यांनी संजय गांधी यांच्यासोबतही काम केलं होतं. तसंच पक्षाच्या अनेक संघटनांची जबाबदारी त्यांच्याकडे होते. अंबिका सोनी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील असून अनेकदा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत.
काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या बैठकीनंतर पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीनंतर दोन उपमुख्यमंत्र्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात आणि शपथविधी सोहळा सोमवारी होण्याची शक्यता आहे.