नवी दिल्ली – अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे ८ हजार नामवंतांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्या निमंत्रितांमध्ये राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपट तारे, क्रीडापटू, राजनैतिक अधिकारी, न्यायाधीश आणि संत असणाऱ्या ५०६ ए-लिस्टर्सचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर ही त्या विशेष यादीमधील ठळक नावे आहेत.
सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, प्रभास, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर या दाक्षिणात्य सुपरस्टार्सप्रमाणेच बॉलीवूडमधील अक्षयकुमार, अनुपम खेर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, कंगणा राणावत आदी आघाडीच्या कलाकारांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तशा चित्रपट ताऱ्यांमध्ये भाजपचे खासदार असणाऱ्या हेमा मालिनी आणि सनी देओल यांचाही समावेश आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा या आजी-माजी क्रिकेटपटूंबरोबरच विश्वनाथन आनंद, पी.टी.उषा, बायचुंग भुतिया हे क्रीडा क्षेत्रातील दिग्गजही निमंत्रित आहेत.
विशेष निमंत्रण असणाऱ्या उद्योगपतींमध्ये रतन टाटा, आनंद महिंद्रा, एन.आर.नारायण मुर्ती, अझिम प्रेमजी आणि इतरांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हेही विशेष निमंत्रित आहेत. इतर नामवंतांमध्ये इस्त्रोचे प्रमुख एस.सोमनाथ, दिल्ली मेट्रोचे प्रधान सल्लागार ई.श्रीधरन, वरिष्ठ वकील हरीष साळवे आदींचा समावेश आहे.
विशेष यादीत आडवाणी आणि जोशीही
विशेष निमंत्रितांच्या विशेष यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांचाही समावेश आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती, त्या पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हेही विशेष निमंत्रित आहेत.