कोलकाता – ऑनलाईन व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी अमॅझॉन व अलीबाबा या चायनीज कंपनीची भागीदारी असलेल्या बिग बास्केटला पश्चिम बंगाल सरकारने ऑनलाईन पद्धतीने मद्याची घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे.
सरकारतर्फे या पूर्वीच झोमॅटो व स्वीगी या ऑनलाईन फूड – डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना घरपोच मद्य पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली होती. झोमॅटो व स्वीगी सध्या कोलकाता व सिलिगुरी येथे घरपोच मद्य पुरवठा सेवा देतायेत.
याबाबतचा निर्णय सरकारी मालकीच्या पश्चिम बंगाल बीव्हीरेज कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतला असून अमॅझॉन व बिग बास्केटला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. बिग बास्केटचे प्रमुख हरी मेनन यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “घरपोच मद्य सेवा कधी पासून सुरु होईल हे आताच सांगणं शक्य नसलं तरी कंपनीचे हे ऑनलाईन मद्य विक्री क्षेत्रात टाकलेले पहिले पाऊल आहे हे मात्र नक्की.” असं सांगितलं.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात मद्य खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये यासाठी राज्य सरकारतर्फे ऑनलाईन पद्धतीने मद्य विक्री व घरपोच सेवा देण्यास परवानगी दिल्याचे पश्चिम बंगाल सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
अमॅझॉनने मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.