बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ताफ्यातील कार दुसऱ्या दोन वाहनांना धडकून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी आधी एका ट्रकला आणि नंतर एका रिक्षाला धडकली. मुख्यमंत्री तुमाकुरूला जात असताना सकाळी हा प्रकार घडला.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या कारच्या मागे त्यांचे सेक्रेटरी एस सेल्वाकुमार यांची कार होती. त्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती प्रथम एका ट्रकला आणि नंतर एका रिक्षाला धडकली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव सेल्वाकुमार हे मुख्यमंत्र्यांच्याच कार मध्ये बसले होते त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कार चालकालाही काही दुखापत झाली नाही पण या कारची ज्या वाहनांना धडक बसली त्यातून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.