डिंभे -जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार, खासदार नसला तरी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्यासोबत आहेत. जिल्हा व तालुक्यातील महत्वाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध करून देणार असल्याचे शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. पेठ- घोडेगाव जिल्हा परीषद गटातील विविध गावांमध्ये मंजूर झालेल्या 85 लाख रुपयांच्या निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरूण गिरे, आदिवासी नेते विजय आढारी, नितीने केंगले, उल्हास काळे, प्रविण कोकणे, तुकाराम काळे, विजय घोडेकर, दशरथ काळे, स्वप्नील सैद, शिवसेना पदाधिकारी, संबंधित गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, आदिवासी बांधव उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना गटनेते म्हणून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिल्यापासून देविदास दरेकर यांनी केवळ आंबेगावच नव्हे; तर अन्य तालुक्यामध्ये लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषदेत विकासात्मक भूमिका मांडण्याचे काम केले आहे. तालुक्यातील अन्य गावांची गरज ओळखून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण ते भीमाशंकर खोऱ्यातील नागरिकांना दळवळणाचा सर्वात जवळचा मार्ग डिंभे जलाशयातून आहे. हा मार्ग अत्यंत सुलभ व्हावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होडीचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
या गावांना मिळाला निधी
ढाकाळे गावातील ग्रामपंचायत कार्यालय 12 लाख, गावठाण अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण 11 लाख, मुख्य रस्ता ते लांघेवस्ती रस्ता डांबरीकरण 7.50 लाख, ढाकाळे स्मशानभूमी बांधणे 5.60 लाख, ग्रामपंचायत कार्यालय ते पंचशीलनगर कॉंक्रिटीकरण 3 लाख, मुख्य रस्ता ते नवबौद्धवस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटार प्रत्येकी 2 लाख,
गवारवाडी गावांत स्मशानभूमी येथे शववाहिनी बसविणे व संरक्षण भिंत बांधणे प्रत्येकी 2 लाख, आरओ वॉटर फिल्टर बसविणे 3 लाख, स्मशानभूमित पेव्हिंग ब्लॉक बसविणे 6 लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत बांधणे 7 लाख,
खटकाळी वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण 6 लाख, इनामवस्ती देवबनवस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण 5 लाख, पारधी कॉम्प्लेक्स रस्ता कॉंक्रिटीकरण 6 लाख, खटकाळी-गणेशनगर रस्ता कॉंक्रिटीकरण 5 लाख आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.