मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने विमानातील मधल्या सीटवर प्रवासी घेण्यास सर्व विमान कंपन्यांना अनुमती दिली आहे. तथापि, करोनाच्या बाबतीतले अन्य नियम मात्र काटेकोरपणे अंमलात आणण्याची सूचना त्यांनी केली आहे.
या संबंधात एक याचिका निकाली काढताना हायकोर्टाने म्हटले आहे की, विमानातले मधले सीट रिकामे न ठेवताही करोना प्रसाराला प्रतिबंध करणाऱ्या नियमांचे पालन करता येऊ शकते. भारतीय विमान वाहतूक संचालनालयाने 31 मे रोजी एक परिपत्रक काढून विमानातील मधले सीट मोकळे ठेवण्याची सूचना केली होती.
तथापि, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांनी विदेशातून भारतात प्रवासी आणताना हे मधले सीट मोकळे ठेवण्याच्या नियमाचे पालन केले नव्हते. तथापि, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीनेच हे मधले सीट सक्तीने मोकळेच ठेवावे ही सूचना अमान्य केली होती असे नमूद करीत कोर्टाने याविषयी आक्षेप नोंदवणारी याचिका फेटाळून लावली आणि विमान कंपन्यांना मधले सीट भरण्याचीही अनुमती दिली आहे.