मंचर- येथील पोलिसांना फेस शिल्ड सुरक्षा कवचाचे वाटप रेक्सवेअर प्लॅस्टिक्स अँड पॅकेजिंग इंडस्टीजचे संचालक साईनाथ गवारी यांच्या वतीने करण्यात आले. फेस शिल्डमुळे बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांचे करोना विषाणूपासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना उद्योजक साईनाथ गवारी यांच्या रेक्सवेअर प्लॅस्टिक्स अँड पॅकेजिंग इंडस्टीजच्या वतीने 5 हजार फेस शिल्डचे वाटप करणार असल्याची माहिती मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
यावेळी युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, अशोक गव्हाणे, मंचर ग्रामपंचायत सदस्य अरुण बाणखेले, आकाश मोरडे, महेश घोडके, अक्षय चिखले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सबाबत नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेऊन काळजी घेण्यासाठी घरीच राहणे आवश्यक असून जीवनावश्यक वस्तूंसाठी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.