लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनन्स यांना पुन्हा करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काल रात्री त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. त्यांना तेथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही तर त्यांना बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे अशी माहिती संबंधीत सूत्रांकडून देण्यात आली.
लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून केवळ दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले. गेले बारा पंधरा दिवस ते आजारी अवस्थेत असले तरी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे ते आपला कारभार करीत आहेत. तथापि सोमवारी रात्री त्यांनी आपली सुत्रे तात्पुरत्या स्वरूपात विदेश मंत्री डॉमनिक राब यांच्याकडे सोपवली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली.