बेल्हे -अडीच महिन्यांपासून बंद असलेले आळेफाटा (ता. जुन्नर) येथील कांदा मार्केट शुक्रवार (दि.28) पासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी बाजारमध्ये 356 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. दिवसभरात 101 रुपये उच्चांकी दराने कांद्याचा लिलाव झाला असल्याची माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे यांनी दिली.
बाजारामध्ये सुरक्षितेत आलेल्या शेतकऱ्यांना व हमालांना बाजार समितीकडून मास्कचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीअभावी पडून होता. मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, संचालक धोंडीभाऊ पिंगट, प्रकाश ताजणे, विपुल फुलसुंदर, निवृत्ती काळे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, कांदा उत्पादक उपस्थित होते.