मद्यपी पोलिसाचा ज्ञानेश्‍वर पादुका चौकात गोंधळ; पोलीस यंत्रणा वेठीस

पुणे: एका मद्यपी पोलिसाने रविवारी सर्व पोलीस यंत्रणेला वेठीस धरल्याची घटना घडली. स्कॉर्पिओतून आलेल्या एकाने पिस्तूल दाखवल्याचे सांगत त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. यानंतर पोलीस लाईनमधील लाईन बॉयला घटनास्थळी बोलावून घेतले. भर रस्त्यात ऐन गर्दीच्या वेळी पोलीसालाच पिस्तूल दाखवल्याने सर्व पोलीस यंत्रणा हादरुण गेली होती.

मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर त्यांना संबंधीत कर्मचारी मद्याच्या नशेत असलेला दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिले असता, त्यांना असा कोणताही प्रकार घडलेला दिसला नाही. तसेच संबंधीत कर्मचारीही सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार देण्यास पुढे आला नसल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत कर्मचारी शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये रहायला आहे. त्याची रविवारी साप्ताहिक सुट्टी होती. यामुळे त्याने मद्यपान केले होते. मद्याच्या नशेत तो ज्ञानेश्‍व पादुका चौकात गेला. तेथून पोलीस नियंत्रण कक्ष, शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणी इतर ओळखीच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्याने फोन केले. एवढेच नव्हे तर त्याने पोलीस लाईनमधील त्याच्या मित्रांनाही कॉल करुन घटनास्थळी बोलावले. स्कॉर्पिओतून आलेल्या एका व्यक्तीने आपल्याला पिस्तूल दाखवले. त्याला पकडायला गेलो असता तो झटापट करत पळून गेला अशी बतावणी त्याने केली.

ऐन वाहतूक कोंडींच्या वेळी आणी रस्त्यावरुन शेकडो नागरिक येजा करत असताना ही घटना घडल्याचे तो सांगत असल्याने पोलिसही विचारात पडले होते. त्याच्या चौकशीत तो मद्य पिल्याचे आढळला. तर परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, अशी कोणतीही घटना आढळून आली नाही. यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सोमवारीही संबंधीत कर्मचारी तक्रार दाखल करण्यास सायंकाळी उशीरापर्यंत आला नव्हता. त्याने केलेल्या कृत्यामुळे पोलीस यंत्रणा मात्र काही तास वेठीस धरली गेली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here