बारामती -बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांची खातेनिहाय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असी मागणी येथील धों. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव प्रशांत सातव यांनी केली आहे. सातव यांनी यासंबंधी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना निवेदन दिले आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे ही काही प्रकरणांमध्ये त्यांना सहाय्य करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक पाटील हे यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी सेवेत होते, तेथे त्यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक गंभीर तक्रारी आहेत. विविध आरोपही आहेत. अन्य अधिकारी, कर्मचारी त्यांना याकामी सहाय्य करत आहेत. त्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत असून या त्रासाला कंटाळून काहींनी बदलीसाठी तर काहींनी नोकरीचा राजीनामा देण्याची मानसिकता केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनासोबत आठ प्रकरणांची माहिती दिली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी केल्याचे तक्रारदारांच्या नावानिशी म्हटले आहे. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणत्या व्यक्तिकडून कोणत्या कारणांसाठी किती रक्कम घेतली हे नमूद केले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षकांनी या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. 15) आम्हाला बोलावले असल्याचेही सातव यांनी सांगितले.
संबंधितांनी ज्या मुद्द्यांवर तक्रार केली आहे, त्यासंबंधी एफआयआर दाखल असून न्यायालयामध्ये त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल. वरिष्ठांचे आदेश झाल्यास त्यांच्याकडे यासंबंधीचे म्हणणे आम्ही मांडू. परंतु केवळ पोलीस दलाची प्रतिमा मलिन व्हावी, या उद्देशाने हे आरोप झाले असावेत असे प्राथमिकदृष्ट्या दिसते.
– औदुंबर पाटील,
निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे