जयपूर – राजस्थानातील पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेसाठीचे सर्व पेपर फुटले असल्याचा आरोप भाजप खासदार किरोडी लाल मीना यांनी केला आहे. पेपर फुटल्यामुळे भरती प्रक्रियेतील एक परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर हा आरोप करण्यात आला आहे.
पेपर फुटण्यासाठी मीना यांनी ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनी, राजस्थान या एजन्सीला जबाबदार धरले आहे.
या एजन्सीला केवळ ऑनलाईन परीक्षा घेण्याचाच अनुभव होता, असे मीना म्हणाले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही ठोस पुरावा मात्र त्यांनी दिला नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पेपर फुटीच्या प्रकरणी आतापर्यंत राजस्थान पोलीस दलातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दिनांक 14 मे रोजी झोतवारा भागातल्या द्वारका माध्यमिक शाळेतील परीक्षा केंद्रावर पेपर फुटीमध्ये एकजण सहभागी असल्याचे राजस्थान पोलिसांच्या “स्पेशल ऑपरेशन ग्रुप’च्या निदर्शनास आले होते. त्यानंतर 16 मे रोजी हे प्रकरण दाखल करून घेण्यात आले होते.