नवी दिल्ली (प्रतिनिधी) – दिल्लीचे उपराज्यपाल (LG) अनिल बैजल यांनी बुधवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मागील मार्च महिन्यापासूनच बैजल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
आता दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून प्रफुल्ल पटेल (प्रशासक, दमन-दीव) व माजी गृह सचिव राजीव महर्षी यांचे नाव आघाडीवर आहे.
अनिल बैजल यांनी डिसेंबर 2016 मध्ये दिल्लीच्या उपराज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती.
ते या पदावर 5 वर्षांहून अधिक काळ राहिले. त्यानंतर आज त्यांनी अचानक आपला राजीनामा राष्ट्रपतींना पाठवला. सूत्रांच्या माहितीनुसार, बैजल यांनी वैयक्तिक कारणामुळे आपला राजीनामा दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व बैजल यांच्यात अनेक मुद्द्यांवर टोकाचा संघर्ष दिसून आला होता. चालू वर्षाच्या सुरुवातीलाच करोना महामारीने वेग घेतला असताना वीकेंड कर्फ्यु व सर्वच दुकानांसाठी सम-विषम नियम लागू करण्यासाठी दोघे एकमेकांपुढे मांड ठोकून उभे राहिले होते. बैजल यांनी यासंबंधीचा केजरीवालांचा प्रस्ताव मान्य करण्यास साफ नकार दिला होता.