आतापर्यंत 5 जणांना घरी सोडले : घरातच थांबण्याचा सल्ला
पुणे – करोनाबाधित आणखी तिघांचे दुसरे नमुनेही निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 19 बाधितांपैकी 5 जणांना घरी सोडण्यात आले आहे. ही समाधानकारक बाब आहे. त्यामुळे करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो, यावरून हे स्पष्ट झाले. याचे सर्व श्रेय डॉक्टरांना जात असून, सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
दुबईहून पुण्यात आलेल्या सिंहगड रोड येथील पहिल्या करोना बाधित दाम्पत्याचे 14 दिवसाच्या उपचारानंतर दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना बुधवारी सकाळी घरी सोडण्यात आले. अन्य तिघांचे पहिले नमुने निगेटिव्ह आले होते, दुसरा नमुने निगेटिव्ह आले तर त्यांनाही घरी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार बुधवारी रात्रीच त्यांचा दुसरा नमुना अहवालही निगेटिव्ह आला.
त्यामुळे डॉक्टर आणि प्रशासनामध्ये आनंदाचे वातावरण होते. करोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये आरोग्य विभाग आणि प्रशासनाला यश मिळत आहे. दरम्यान, या तिघांना गुरुवारी सकाळी घरी सोडण्यात आले.
पुढील 14 दिवस या तिघांनीही घरातच थांबायचे आहे. त्यांनी काय आहार घ्यावा, कसे रहावे याबाबतच्या सूचना डॉक्टरांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच राहिलेल्या 14 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील तीन व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आता पुढील दोन व्यक्तीचे 14 दिवसांचा कार्यकाळ दोन दिवसांनी पूर्ण होणार आहे. त्यांचीही असाच पद्धतीने दोनवेळा नमुने तपासणी करून घरी सोडले जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.