शिवपाल यांच्या विरोधातील अपात्रतेबाबतची याचिका मागे
बलिया – उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका समाजवादी पक्षाने (सप) मागे घेतली. त्यामुळे सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवी संपण्याच्या मार्गावर असल्याचे आणखी संकेत मिळाले आहेत.
मुलायम यांचे बंधू असणारे शिवपाल 2017 मधील निवडणुकीत सपच्या तिकिटावर उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले.
त्या निवडणुकीच्या आधीपासूनच शिवपाल आणि सपचे अध्यक्ष अखिलेश यादव या काका-पुतण्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले. ते विकोपाला जाऊन शिवपाल यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यापार्श्वभूमीवर, मागील वर्षी सपने शिवपाल यांच्या विरोधात उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींकडे याचिका दाखल केली. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत शिवपाल यांना आमदार म्हणून अपात्र ठरवले जावे, अशी मागणी त्या याचिकेतून करण्यात आली.
मात्र, मागील काही दिवसांपासून शिवपाल आणि अखिलेश यांच्यात मनोमीलन होण्याची चिन्हे असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच सपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामगोविंद चौधरी यांनी याचिका मागे घेण्याविषयीची माहिती पत्रकारांना दिली. याचिका मागे घेतल्याने शिवपाल स्वगृही (सप) परततील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राजकारणात काहीही शक्य असल्याचे सूचक उत्तर चौधरी यांनी दिले.