मुंबई – प्लेऑफ पात्रतेच्या आशांवर टांगती तलवार असताना चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेच्या उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार जडेजासाठी हा हंगाम खराब निराशाजनक ठरत आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर अष्टपैलूच्या शरीराच्या वरच्या भागाला झालेल्या दुखापतीमुळे आता त्याच्यावर आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे.
बेंगळुरू विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना जडेजाला मार लागला होता. त्यावेळी मैदानात त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यातूनही बाहेर बसला होता.
अशा परिस्थितीत आयपीएल प्लेऑफ शर्यतीच्या शेवटी जडेजाची अकाली दुखापत हा चेन्नईसाठी मोठा धक्का ठरू शकते. एम. एस. धोनीच्या नेतृत्वातील “सुपर किंग्ज’ संघाला प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ आता “करो किंवा मरो’च्या लढतीत मुंबई इंडियन्स विरुद्ध उद्या मैदानात उतरणार आहे.