आंबेठाण – संपूर्ण देश करोनाशी लढा देत असताना आंबेठाणमध्ये एका किराणा मालाच्या दुकानातून दारूविक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी राजू पाठक (रा. आंबेठाण) व चांद ठाकुर (रा. तळवडे) यांच्यावर महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गावच्या पोलीस पाटील यांना ही माहिती मिळाली असता त्यांनी ग्रामसुरक्षा दल व पोलीस यांच्या मदतीने त्याठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यामध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तसेच एका भंगाराच्या दुकानातून देखील दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे. आंबेठाण गावात अनेक ठिकाणी दारूविक्री होते अशी तक्रार गावातील महिलांनी केली होती.
मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांकडून केली जात नव्हती. अशी तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. ही कारवाई करताना तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामसुरक्षा दलातील सर्व सदस्य, ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य मिळाले.
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांची कुठल्याही प्रकारची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहेत.
-बालाजी सोनटक्के, वरिष्ठ पोलीस निरीक्षक