बारामती -शासकीय नियमांच्या अधीन राहून दुकाने सुरू करता येणार असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले असल्याने बारामती शहरातील रस्त्यांवर आज वर्दळ होती. रस्त्यावर वर्दळ असली तरी बारामती शहर मात्र आजही ही टाळेबंद राहिले.
शहरातील काही भागात अद्यापही कंटेनमेंट झोन सुरू असल्याने शहर बंद ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले. शहरातील म्हाडा कॉलनी येथील कंटेनमेंट झोन 12 तारखेला संपणार असून त्यानंतरच शहरातील शासकीय नियमांच्या आदेशानुसार दुकाने सुरू होतील.
शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांना देखील या निर्णयाबाबत अवगत करण्यात आले आहे. त्यामुळे बारा तारखेनंतरच बारामती शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार 12 तारखेनंतर एका रोडवरील किंवा लेनमधील केवळ पाच दुकानांना एका दिवशी परवानगी दिली जाईल.