एकाच दिवसात देशातील 1074 रूग्ण करोनामुक्त

बरे होण्याचे प्रमाण 27.45 टक्के
नवी दिल्ली : मागील 24 तासांत देशातील करोनाबाधितांमध्ये 2 हजार 573 इतक्‍या विक्रमी संख्येची भर पडली. त्याचवेळी देशात एकाच दिवसात तब्बल 1 हजार 74 रूग्ण करोनामुक्त होण्याचा उच्चांकही नोंदला गेला. करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत असली तरी देशाला दिलासा देणाऱ्या घडामोडीही घडत आहेत.

देशातील सुमारे 12 हजार करोनाबाधित आतापर्यंत बरे झाले आहेत. रूग्ण करोनामुक्त होण्याचे देशातील प्रमाण 27.45 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. करोना संसर्गामुळे मागील 24 तासांत देशभरात 83 रूग्ण दगावले. त्यामुळे मृतांची संख्या 1 हजार 400 च्या घरात पोहचली आहे. महाराष्ट्रात बाधित आणि बळींची संख्या देशात सर्वांधिक आहे. त्यापाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागला आहे. त्या राज्यातील बाधितांची संख्या याआधीच 5 हजारांवर गेली आहे. तर गुजरातमध्ये करोनाने जवळपास 300 जणांचा बळी घेतला आहे.

दिल्लीत 4 हजार 500 तर तामीळनाडूत 3 हजार 500 हून अधिक रूग्णांना करोनाची लागण झाली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यांत 3 हजारांच्या आसपास करोनाबाधित आढळले आहेत. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 111 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.