लखनोै – कुविख्यात गुन्हेगार अजितसिंग यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गिरीधारी विश्वकर्मा हा आज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. या चकमकीत तीन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
गिरीधारी याला आज खरगपुर येथे नेले जात असताना वाटेत त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रथम त्याने एका पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करून त्यांना खाली पाडले आणि त्यांच्याकडील पिस्तुल घेऊन त्याने तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. तो एका झुडुपात लपला. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षकाने घटनास्थळी जादा कुमक मागवली.
त्याला पोलिसांनी चारही बाजूने घेरल्यानंतर त्याला शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते पण त्याने पोलिसांना न जुमानता त्यांच्यावर गोळीबार सुरूच ठेवल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. गिरीधारी विश्वकर्मा हाही एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.