पाटणा, -भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (भाकप) उगवता तारा म्हणून ओळखला जाणारा तरूण नेता कन्हैय्या कुमार याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतली. त्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असणाऱ्या कन्हैय्याने रविवारी बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांची भेट घेतली. जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष चौधरी हे नितीश यांच्या खास मर्जीतील नेते असल्याने त्या भेटीने बिहारमध्ये राजकीय खळबळ उडवून दिली.
कन्हैय्या आणि चौधरी यांची भेट बिगरराजकीय स्वरूपाची असल्याचे दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी सांगितले. तसे असले तरी त्या माहितीवर तातडीने कुणी विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचेच राजकीय कुजबुजीवरून सूचित होत आहे. कन्हैय्या याचे स्वपक्षाबरोबरचे संबंध ताणले गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कन्हैय्या आणि चौधरी यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आक्रमक भाषण शैलीसाठी कन्हैय्या ओळखला जातो. मात्र, नितीश यांच्याविषयी त्याची भूमिका बऱ्याचदा मवाळ दिसते. त्यामुळेही संबंधित भेटीने कुतूहल वाढवले आहे. जेडीयूचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला मात्र ती भेट रूचलेली नाही. ती भेट योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.