Eknath Khadse – कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेट दिली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. ‘अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा जोक आहे. किमान अजित पवार यांनी आपल्या मुलाला तरी समजावलं पाहिजे’. असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “अजित दादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद आहे. अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेचं समर्थन करत असतील, कायदा-सुव्यवस्था चांगली आहे तर मग त्यांचे चिरंजीव पार्थ पवार गजानन मारणे याची भेट घेतात, हा गजानन मारणे टोळीचा प्रमुख आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला जातो. असे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. अशांना भेटणं योग्य नाही. किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवावं..’ असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. दरम्यान,गज्या मारणेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता या राजकिय भेटीने कलगीतुरा रंगणार असल्याचे बोलले जात आहे.