Ajit Pawar on Nilesh Lanke – महाराष्ट्रामध्ये सुरु असलेली राजकीय उलथापालथ थांबण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. पारनेरचे आमदार निलेश लंके लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारून सत्ताधारी गटात गेलेले लंके पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार आहेत. गुरुवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं नक्की मानलं जात आहे.
अशातच आता, निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जाणार असल्याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी एका मंत्र्यांविरोधात माझ्याकडे तक्रार केली. त्यांच्यासमोर सतत अडचणी येत आहेत. मी त्यांना आश्वासित केलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आपण एकत्र बसू. तुम्हाला ज्या मंत्र्यामुळं त्रास होतो, त्यांनाही आपण बोलवुया. जे समज-गैरसमज झाले असतील ते सोडवुया. पण तू व्यवस्थित राहा, चुकीचा निर्णय घेऊ नको, अशी मी त्यांची समजूत घातली होती”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
‘…तर लंकेची आमदारकी जाणार’
“निलेश लंके आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांना व्हिप लागू झालेला आहे. त्यांनी जर स्वतः वेगळा निर्णय घेतला तर त्यांना राजीनामा देऊनच निवडणुकीला उभं राहावं लागेल.” अशी टेक्निकल बाजू अजित पवार यांनी सांगितली आहे.
निलेश लंके पारनेरपुरता लोकप्रिय… । Ajit Pawar on Nilesh Lanke
“निलेश लंके पारनेरपुरता लोकप्रिय असून तिथे तो काम करू शकतो. पण बाकिच्या विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा मिळवणं निलेश लंकेला जितकं सोपं वाटतं, तितकं नाही. निलेश लंकेंना पक्षात मी आणलं, त्याला आधार दिला. त्यांना विकास कामांसाठी मी नेहमीच पाठिंबा देत आलो. पण त्यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची हवा घातली आहे. पण वास्तव तसे नाही. मी त्यांची समजूत घातली होती, पण शेवटी निर्णय त्यांचा आहे” असेही अजित पवार म्हणाले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढणार?
निलेश लंके शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ते इच्छूक आहेत. येथे भाजपचे सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये २०२४ लोकसभा निवडणुकांसाठी सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पारनेरचे आमदार असलेले निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना येथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. लंके यांना उमेदवारी मिळाल्यास सुजय विखे विरुद्ध लंके अशी रंजक लढत पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या । Ajit Pawar on Nilesh Lanke
“…पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार…?” वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट
‘दादां’विरोधात बापू मैदानात, शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘बारामती’बाबत भाष्य…