पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळला आहे. स्वतः अजित पवार यांनी या बद्दल माहिती दिली आहे. काल म्हणजेच 14 जानेवारीला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमापूर्वी ही घटना घडल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. “लिफ्टमधून जात असताना अचानक लाईट गेले आणि ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून थेट खाली आली’, असं अजित पवार म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या सोबत घडलेला हा धक्कायक प्रकार सांगितला आहे.
अजित पवार म्हणाले, ‘मी काल कुठे बोललो नव्हतो, पण तुम्ही घरचे आहात म्हणून बोलतो. काल मी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. दादा तिसऱ्या मजल्यावर आलात आता चौथ्या मजल्यावर लिफ्टने जाऊ असं ते म्हणाले. मी नको म्हणालो. तरी आम्ही लिफ्टमध्ये बसलो, लिफ्ट वर जाईना, तिथच बंद झाली, मग लाईट गेले. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट दाणकन खाली आली. आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता,’ असं अजित पवार म्हणाले. अजित पवार असं म्हणताच यावेळी एकच हशा पिकला.
तसेच ते पुढे म्हणाले, “याबाबत मी पत्नी आणि आईलाही बोललो नाही. हे कुणाला बोलू नका, हे मी सर्वांना सांगितलं होतं, त्यामुळे या घटनेबद्दल कुणालाच काही समजलं नाही… आपण आपली काळजी घेतली पाहिजे’. असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट.!
पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचाकनपणे पेट घेतल्याची घटना काल घडली. सुदैवाने या दुर्घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. साडीला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी ती विझवली. सुदैवानं ही आग मोठी नव्हती आणि तात्काळ विझविण्यात आली.