नारायणगाव -वडगाव कांदळी वडामाथा (ता. जुन्नर) येथील चवळीच्या शेतात दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या अनोळखी महिलेच्या खून दुहेरी प्रेमसंबंधातून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अनोळखी मृत महिलेच्या जवळ आढळून आलेल्या मावा पुडी व बारकोड स्टीकरच्या आधाराने या घटनेचा तपास करून आरोपींना गजाआड करण्यात नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांना यश आले या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना जुन्नर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
सुनितादेवी शिवकुमार यादव (वय 30 सध्या रा. नागापूर, मुळ रा. मिरजावा ता. तिरवेणीगंज जि. सुपौल राज्य बिहार) या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केला होता. तर शुभम मनोज गुळसकर (वय 22 रा. बोल्हेगाव अहमदनगर), मिथीलेश डोमी यादव (रा. एम. आय. डी. सी वडगाव कांदळी ता.जुन्नर, मुळ रा. मिरजावा ता. तिरवेणीगंज जि.सुपौल राज्य बिहार) असे कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांना शुक्रवारी (दि. 13) महिलेच्या मृतदेहाजवळ अहमदनगर जिल्ह्यात मिळणारी माव्याची पुडी व अंगावरील ओढणीला सुविधा मार्केट असलेले बारकोड स्टिकर मिळाले. तोच धागा पकडून नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून अहमदनगर येथे पाठविण्यात आले.
पोलीस पथकाने तपास करुन अहमदनगर येथून गुळसक यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता साथीदार मिथिलेश डोमी यादवाच्या मदतीने यादव हिचा गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. मयत महिलेचे दोघांबरोबर गेली एक वर्षापासून प्रेम संबंध होते.
आरोपींनी मयत महिला सातत्याने पैशाची मागणी करून मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले. गुन्ह्याचा तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, विनोद धुर्वे, गुन्हे शाखेचे जगदाळे, दीपक साबळे, संदीप वारे, पोपट मोहरे, दिनेश साबळे, सचिन कोबल, हासे, वैद्य, वाघमारे, ढेंबरे पोलीस पथकाने मदत केली.