Ajit Pawar meets Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विद्यमान भाजप – शिवसेना (शिंदे) सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच पुण्यात शरद पवार व अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये देखील नाराजी पसरली आहे. अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत भूमिका मांडली आहे.
ती भेट गुप्त नव्हती
पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरामध्ये शरद पवार व अजित पवार यांची, शनिवारी (ता.१२ ऑगस्ट) भेट झाली. या भेटीनंतर बाहेर पडताना अजित पवार गाडीत झोपून गेले. ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर पवार काका – पुतण्यांमधील या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या. पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरु आहेत याबाबतचे विविध तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली. मात्र शरद पवार यांनी लागलीच याबाबत भूमिका मांडताना आपण भाजपसोबत जाणार नसल्याबाबत ठाम असल्याचा निर्वाळा केला होता. अशातच आज अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडताना शरद पवार यांच्यासोबतच्या ती भेट गुप्त नव्हती असं सांगितलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
स्वातंत्र्यदिनानिमित्त कोल्हापूर येथे असलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीबाबत विचारले असता, अजित पवार यांनी शरद पवार आपले काका असल्याने त्यांना भेटण्यात काहीही गैर नसल्याचे सांगितले. पुण्यात चोरडिया यांची घरी भेट झाली, चोरडिया यांच्याशी आमचे दोन दशकांचे कौटुंबिक संबंध असल्याचं तसेच ते शरद पवार यांचे वर्गमित्र असल्याचं अजित पवार म्हणाले. ही भेट गुप्त असल्याच्या चर्चा नाकारताना अजित पवार यांनी, दिवाळी व दसऱ्यालाही शरद पवार यांना भेटणार असल्याचे सांगितले. यामागे कोणतेही राजकीय डावपेच नाहीत, भेटीला वेगळं वळण देऊ नका असं अजित पवार म्हणाले.
शरद पवारांची री ओढली…
अजित पवार याणच्यासोबतची भेट माध्यमांच्या प्रकाश झोतात आल्यानंतर शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं होत. अजित पवार आपले पुतणे असून त्यांच्यासोबतची भेट हा माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरू शकत नाही, असं पवार यांनी सांगितलं होत. शरद पवार यांनी मांडलेली भूमिकाच अजित पवार यांनी मांडताना, शरद पवार आपले काका असल्याने त्यांना भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं. असं असलं तरी, अजित पवार यांनी, शरद पवार यांना भेटण्यासाठी ताफा सोडून जाणं, भेटीनंतर वाहनातून झोपून बाहेर पडणं हे का केलं? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
अजित पवार शरद पवारांना पुन्हा भेटणार
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी दिवाळी व दसऱ्याला काका शरद पवार यांची पुन्हा भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी दिवाळी निमित्त पवार कुटुंबीय एकत्र येतात. यंदा मात्र अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी विसंगत भूमिका घेतल्याने ही परंपरा खंडित होणार काय? अशीही कुजबुज सुरु होती. अशात खुद्द अजित पवार यांनी दिवाळी, दसऱ्याला शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सांगत कुटुंब म्हणून एकत्र राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.