Rahul Gandhi And Sonia Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. कारण, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमच्या एका नेत्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. आई सोनिया गांधी यांना नूरी नावाचा कुत्रा भेट दिल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी जागतिक प्राणी दिनानिमित्त या कुत्र्याला भेट देताना एक व्हिडिओ पोस्ट केला होता. याचिकाकर्त्याने राहुल गांधींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) नेते मोहम्मद फरहान यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, कुत्र्याच्या नावाने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कारण, ‘नूरी’ हा शब्द विशेषत: इस्लामशी संबंधित आहे आणि कुराणातही त्याचा उल्लेख आहे. न्यायदंडाधिकारी कार्यालयाने पुष्टी केली आहे की AIMIM नेत्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना फरहानचे वकील मोहम्मद अली यांनी सांगितले की, त्यांनी सोमवारी न्यायदंडाधिकारी अविरल सिंग यांच्या न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 295A (धार्मिक भावना दुखावने) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
वकिलाने सांगितले की, एआयएमआयएम नेत्याला विविध वृत्तपत्रे, राहुल गांधींचे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलवरून कुत्र्याच्या नावाची माहिती मिळाली. यानंतर त्यांच्या क्लायंटने वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून राहुल गांधींना कुत्र्याचे नाव बदलून जाहीर माफी मागण्याचा सल्ला दिला, पण त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.
कोर्टाने फरहानला 8 नोव्हेंबरला त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तक्रारीचा विचार केल्यानंतर न्यायालय राहुल गांधींना समन्स देऊ शकते.