नगर – निकालाची उत्कंठा अन् विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच उपस्थितांनी केलेला जल्लोष अविस्मरणीय ठरला. दैनिक प्रभाततर्फे आयोजित राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धा सलून व्यावसायिकांसाठी आनंदसोहळाच ठरला. राहता येथील अर्जुन माधव बिडवे स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले.
शेवगाव येथील रोहित मीनानाथ वाघमारे याने दुसरा, तर औरंगाबादचा वजेश फकीरराव पंडित यांनी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. सहभागी झालेल्या स्पर्धकांची कलाकारी पाहून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक डिझायनर अनेकदा संभ्रमात पडले. त्यामुळे उत्तेजनार्थ आणखी दोन बक्षिसे देण्यात आली. त्यात साताऱ्याचा संतोष गणपतराव काशीद व नगरमधील सौरभ राजेंद्र मदने यांचा गौरव करण्यात आला.
दैनिक प्रभातच्यावतीने आयोजित व अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जेन्टस् हेअरकट स्पर्धेला काल उदंड प्रतिसाद मिळाला.
आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्यास दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक सीए रवीकुमार इंडी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे, उद्योजक अनिल वाबळे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत, ऍड. शिवजित डोके यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर व्यासपीठावर उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या स्पर्धेत 110 स्पर्धक सहभागी झाले. त्यातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनगर सयाजी झुंजार, सचिन टक्के, सिद्धार्थ अनारसे, शंकर डांगे, मनीष शिंदे व महेश मोरे यांनी विजेत्या स्पर्धकांची निवड केली. उपस्थितांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवडण्यात आलेल्यांमध्ये गणेश कदम (नगर), सुरण सोनवणे (कुकाणा, ता. नेवासे), संतोष वाघमारे (नगर), सोहम वाघ (श्रीरामपूर), जितेंद्र बोर्डे (नगर), ज्ञानेश्वर राऊत (नगर), आशुतोष वाघमारे (नगर), सागर शिंदे (नागरदेवळे, ता. नगर) या भाग्यवतांना बक्षिसे देण्यात आली.
महापौर बाबासाहेब वाकळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनील वाघमारे, विभागीय उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
नाभिक महामंडळाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विकास मदने यांनी प्रास्ताविक केले. सनी मर्दाने यांनी सूत्रसंचालन केले. अहमदनगर जिल्हा सलून-चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ यांनी आभार मानले.
राज्यस्तरीय हेअरकट स्पर्धेच्या नियोजनासाठी महेंद्र जाधव, दिगंबर कुटे, अजय कदम, विशाल मदने, गणेश कदम, बापू क्षीरसागर, भाऊसाहेब काळे, अशोक खामकर, महेश गायकवाड, नीलेश शिंदे, जनार्दन शिंदे, सिद्धांत झेंडे, विनोद साळुंके, अमित वाघमारे, अभिषेक खामकर, ओंकार काळे, दिलीप शिंदे, शिवाजी दळवी, शहाजी कदम, अरुण वाघ, संजय भुजबळ, सत्तार अली शेख, संजय मदने, शरद दळवी, किशोर मोरे, अनिल कदम, नवनाथ मदने यांनी परिश्रम घेतले.
नगरचे “मॉडेल’ राज्याला पथदर्शी : अनारसे
दैनिक प्रभाततर्फे आयोजित व अहमदनगर जिल्हा नाभिक समाज ट्रस्ट, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक असोसिएशन व महाराष्ट्र नाभिक महामंडळाने पुढाकार घेऊन राबविलेली राज्यस्तरीय हेअरकट स्पर्धा महाराष्ट्राला पथदर्शी आहे, अशी भूमिका महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे यांनी व्यक्त केली. हा प्रयोग यापुढे राज्यभर जिल्हानिहाय राबविण्याचा मानस असल्याचे विचारही त्यांनी व्यक्त केले.
दैनिक प्रभातने सुंदर उपक्रम केला : महापौर
सलून व्यावसायिकांसाठी दैनिक प्रभातने आयोजित केलेला स्पर्धेचा हा उपक्रम सुंदरच आहे, अशी भूमिका महापौर बाबासाहेब वाकळे यांनी स्पष्ट केली. नाभिक समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नगर महापालिकेमार्फत योग्य ते निर्णय घेण्याचे काम केले जाईल. शिवाय नाभिक समाजातर्फे बांधण्यात येत असलेल्या श्री संत सेना महाराज भवनासासाठी भरीव मदत केली जाईल, असे आश्वासनही महापौर वाकळे यांनी यावेळी दिले.