नगर – जिल्हा परिषद श्रेणी 3 च्या कर्मचारी भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनासह परीक्षा पद्धत राबविणारी खासगी कंपनी सज्ज झाली आहे. 937 जागांसाठी ही भरती होणार असून त्यासाठी 44 हजार 626 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. चार दिवस परीक्षा सत्र सुरू राहणार असून त्यासाठी 2 हजार 300 उमेदवार असतील.
937 जागांसाठी टप्प्याटप्प्याने परीक्षा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 ऑक्टोबरला वरिष्ठ सहायक लेखा या पदांसाठी परीक्षा होत आहे. त्याचप्रमाणे दि. 8 ला विस्तार अधिकारी (सांख्यिकी), दि. 10 ला विस्तार अधिकारी (कृषी), तर दि. 11 ला लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी), तसेच वरिष्ठ सहायक (लेखा) या पदांसाठी परीक्षा होत आहे. दरम्यान, परीक्षेची सर्व तयारी झाली असून, सहा केंद्रांवर उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत ही भरती होत असून, परीक्षेचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे वर्ग अ व ब चे अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत.
रिंगमन, आरोग्य पर्यवेक्षक ही पदे अहमदनगर जिल्ह्यात नाहीत. मात्र, इतर ठिकाणच्या उमेदवारांसाठी नगरमध्ये केंद्र देण्यात आले आहे. तेथे 80 उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्राबाहेर दोन पोलीस नियुक्त केले जाणार आहेत. तसेच पर्यवेक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात जॅमर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर संपर्क साधता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सहा ठिकाणी परीक्षा केंद्रे
या परीक्षेसाठी जिल्ह्यात सहा केंद्र राहणार आहे. त्यापैकी बहुतांशी नगर शहरात आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय (नेप्ती, ता. नगर), अचिवर्स इन्फोटेक श्री भाऊसाहेब म्हस्के महाविद्यालय (टाकळीकाझी, ता. नगर), विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालय (सारोळा बद्दी, ता.नगर), सुमन टॅलेंट (आनंदऋषी रुग्णालयाजवळ, बुरूडगावरोड, नगर),सोनिया गांधी पॉलिटेक्निक (श्रीगोंदा, मांडवगणरोड), बबनराव पाचपुते ट्रस्ट परिक्रमा (काष्टी, ता. श्रीगोंदा).