नेवासा – भारतीय प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी सकाळी १० वाजता मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामसभेत महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारुबंदीची एकमुखी मागणी केली. या ग्रामसभेत सर्वानुमते या ठरावावर उपस्थित महिला – पुरुष व युवकांनी एकमत दाखवत ठराव संमत करण्याची मागणी केली. या ग्रामसभेलाच उपस्थित असलेल्या काही हॉटेल व्यावसायिकांनीच आमच्या जीवावर लोक पोट भरतात. तुमचे नवरे ताब्यात ठेवा, असे खडसावल्यामुळे महिलांचा चांगलाच पारा चढला. यामुळे ग्रामसभेत गदारोळ उडाला महिलांना भर ग्रामसभेत अरेरावी झाल्यामुळे आक्रमक महिलांनी थेट नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सन २०१४ मध्ये महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन उभी बाटली आडवी केलेली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने या ठरावाची दखल घेतली नसल्यामुळे पुन्हा या ठरावाची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य अमोल घुले यांनी दारुबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिलेले होते. खेळीमेळीत सुरू झालेली ही ग्रामसभा दारुबंदीचा विषय एरणीवर आल्यानंतर महिलांनी आक्रमक पावित्रा घेत गावात दारुबंदी करा, अशी जोरदार एकमुखी मागणी केली.
या ग्रामसभेला काही बियरबारबार चालकच उपस्थित राहून महिलांनी केलेल्या मागणीला विरोध केल्यामुळे महिलांनी ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेऊन चांगलाच गदारोळ झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत अॅड.अशोक कर्डक, प्रविण साळवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, माजी सरपंच अशोक उपळकर, महेश निपुंगे, राजू साळवे, दत्ता उपळकर, प्रताप हांडे यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन राडा मिटविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असला तरी पुन्हा दारुबंदी विषयावर नेवासा फाटा येथील महिला आक्रमक झाल्यामुळे राडा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक जाधव यांनी आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या.