ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची भूमिका
पुणे – आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फेस मॅपिंग हा नवा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारांबाबत हॉलिवूडमधील कलाकार मंडळींनी विरोध दर्शविला आहे. त्याबाबत मलाही चिंता वाटते, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज येथे मांडली.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बच्चन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, अधिष्ठाता डॉ. रूची खेर जग्गी आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञानात दर तीन महिन्यांनी नव्याने भर पडत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही अपडेट राहण्याचा प्रयत्न केला तरी, तुम्हाला दरवेळी नव्या तंत्रज्ञानाशी सामना करावा लागेल.
आगामी काही दिवसांत अशी परिस्थिती येईल की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील फेस मॅपिंगने तयार झालेल्या अमिताभ बच्चनलाच सिम्बायोसिसमध्ये व्य़ाख्यान देण्यासाठी बोलवतील, अशीही चिंताही बच्चन यांनी यावेळी व्यक्त केली.