कोरेगाव – कोरेगाव तालुक्यातील नवमतदारांना स्पीड पोस्टद्वारे मतदार ओळखपत्रे पाठवण्यात येत आहेत. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी टपाल विभागाने कोरेगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेला बारकोड पुरविले आहेत. मतदार ओळखपत्रे नवमतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी दिली.
नवमतदारांची मतदार ओळखपत्रे स्पीड पोस्टाद्वारे घरपोच देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने टपाल विभागाबरोबर करार केला आहे. त्यानुसार कोरेगाव तालुक्यात मतदार ओळखपत्र स्पीड पोस्टाने पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे नवमतदारांना त्यांची मतदार ओळखपत्रे सुलभरित्या मिळतील. कोरेगाव तालुक्यातील मतदारांना तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा अथवा मतदान केंद्रस्तरावर बीएलओ यांच्याकडून ओळखपत्रे दिली जाणार नाहीत. ही ओळखपत्रे टपाल विभागामार्फत घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे डॉ. कोडे यांनी सांगितले.