पिंपरी – मोशी चिखली येथील आरक्षण क्रमांक पीजी १/१३७ ही एक हेक्टरची जागा क्रीडा मैदानासाठी आरक्षित असताना ती हॉर्स रायडिंगसाठी देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या विरोधात शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपशहर संघटिका रुपाली आल्हाट यांनी आजपासून चिखली-मोशी येथील श्रीराम चौकात उपोषण सुरु केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दवाखाने, शाळा, उद्याने, क्रीडा मैदाने विकसित करण्यासाठी मोकळे भूखंड आरक्षित केले आहेत. मोशी येथील आरक्षण क्रमांक पीजी १/१३७ या एक हेक्टर भूखंडावर क्रीडा मैदानाचे आरक्षण आहे. क्रीडा मैदान विकसित करण्याऐवजी ही जागा खासगी व्यवसायिकाला देऊन त्याठिकाणी हॉर्स रायडिंग सुरु करण्यात येत आहे.
येथील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. यामुळे नागरिकांची ही गरज पालिका कशी भागवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मैदानावर हॉर्स रायडिंग सुरु करण्यासाठी प्रशासनाने केलेली प्रक्रिया आयुक्तांनी रद्द करावी, अन्यथा आपण याविरोधात उपोषण करणार असल्याचे आल्हाट यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने आल्हाट यांनी मंगळवार (दि. २९) पासून उपोषण सुरु केले आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने पाठिंबा दर्शविला आहे.
मूळ शेतक-याकडून ही जागा कवडीमोल दराने घेतली आहे. त्या जागेवर क्रीडा मैदानाचे आरक्षण टाकले. आता ते बदलून ही जागा खासगी व्यवसायिकाच्या घशात घालण्यात आली आहे. याठिकाणी हॉर्स रायडींग करण्यासाठी स्थानिक नागरिकांना व त्यांच्या मुलांना प्रति व्यक्ती ८ ते १० हजार रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. पालिकेच्या पाठबळावर व्यावसायिक मालामाल आणि स्थानिक नागरिक कंगाल होणार असल्याची खंतही आल्हाट यांनी व्यक्त केली आहे.