संगमने – मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघताच संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर मराठा समाज बांधवांनी डीजेच्या दणदणाटात जल्लोष केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता. अखेर आज राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहे.
ही घोषणा करताच समाज बांधवांनी जल्लोष केला. संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरात एकत्र जमून “एक मराठा लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” आशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुन्हा त्या ठिकाणाहून बसस्थानक परिसरात एकत्र येत डीजेच्या गाण्यांवर संपूर्ण मराठा समाजाने जल्लोष साजरा केला.
मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू करण्यात आला. मराठा समाजाची हीच खरी दिवाळी असल्याचे समाज बांधवांनी सांगितले. समाज बांधवांनी यावेळी राज्य सरकारचे आभार मानत सर्वांना पेढे, जिलेबी आणि मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला.
मुस्लिम बांधवांनी भरली जिलेबी
सकल मराठा समाजाच्या जल्लोषादरम्यान माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी प्रत्येकाला जिलेबी भरवत असताना काही मुस्लिम बांधवांनी तांबे यांना जिलेबी भरवून उत्सवात सहभागी झाल्याने सर्वांनाच त्या ठिकाणचे फोटो टिपण्याचा मोह आवरता आला नाही..