पाथर्डी -दसऱ्यानिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. सकाळी संत भगवानबाबांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होऊन सायंकाळी गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. या वेळी भगवानगड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “भगवान बाबा की जय’ अशा भक्तांच्या जयघोषातून भगवानगड परिसर दुमदुमून गेला.
दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाची निर्मिती झाली होती, म्हणून या दिवशी भगवानगडावर दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी भगवान गडावरील भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेत गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. परिसरातील नागरिक व भाविकांनी गडावर पारंपरिक ढोल-लेझीम खेळ सादर केले.
मिळेल त्या वाहनाने भाविक गडाकडे येत होते. बाबांच्या समाधी मंदिरापासून ते मुख्यद्वारापर्यंत काही वेळ भाविकांची रांग लागली होती, तर काही भाविकांनी सकाळीच दर्शन घेत पंकजा मुंडे यांच्या घाटसावरगाव येथील मेळाव्यास जाणे पसंद केले, तर काही भाविक मुंडे यांचा मेळावा संपन्न झाल्यानंतर गडावर दर्शनासाठी आले. भगवानबाबा ज्या गादीवर गादीवर बसत होते, त्याच गादीवर बसून नामदेवशास्त्री यांनी आलेल्या भविकांना आशीर्वाद दिले. सायंकाळी सीमोल्लंघनाचा जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात सहभागी होणारा घोडा दुपारी गडावर दाखल झाला व त्याने नामदेवशास्त्री यांचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी या घोड्याचे दर्शन घेतले. सायंकाळी सीमोल्लंघन, शस्त्रपूजन व गुरुमंत्राचा कार्यक्रम झाला.
या वेळी नामदेवशास्त्री म्हणाले की, यापूर्वी एकाच जागेवर गर्दी होती त्यामुळे ती गर्दी दिसायची. मात्र, आता दुपार झाली तरी गडावर सर्वच ठिकाणी भक्तगण दिसत आहे. भगवानबाबांच्या दर्शनासाठी उत्स्फूर्तपणे लोक येतात. ऊसतोड मजूर आज भगवानगडावर ज्ञानेश्वर मंदिर बांधत आहे. युवकांनी शिक्षण घ्यावे, व्यसनमुक्त व्हावे आणि ज्ञानेश्वरी वाचावी, असा सल्लादेखील त्यांनी दिला.