राहाता – गावोगावी होणारे आध्यात्मिक कार्य हे समाज जोडण्याच्या कामासाठी उपयुक्त ठरते. भक्तिपीठ ते शक्तिपीठ हा तीर्थयात्रेचा उपक्रम अशा कामातूनच प्रत्यक्ष कृतीत उतरला. या यात्रेनिमित्ताने सामाजिक दायित्व निभावता आले याचे मोठे समाधान आहे. अशा कामातूनच अधिकचे काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोणी खुर्द येथील भक्तिपीठ ते शक्तिपीठ या उपक्रमातून मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील पन्नास हजार महिलांना श्रावण आणि अधिक महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शन सोहळा घडविल्याबद्दल श्री साई सदिच्छा पारायण ग्रुपने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते.
या वेळी शांतिनाथ आहेर, संजय जोशी, सिंधुताई विखे पाटील महिला भजनी मंडळ, रणरागिणी महिला मंडळ, प्रवरा जॉगर्स अँड ट्रेकर ग्रुप, गगनगिरी भक्त मंडळ, आशीर्वाद नगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, महिलांसाठी होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे महिलादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्याचे समाधान मोठे आहे. तरुणांनी व्यावसायिक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (गुरुवार) शिर्डी दौऱ्यावर येणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करून येणाऱ्या काळात पशुसंवर्धन महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, शिर्डी विमानतळ या माध्यमातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून, याचा फायदा परिसराला होऊन त्याचा दळणवळणावर मोठा परिणा होणार असल्याचे मंत्री विखे यांनी या वेळी सांगितले. या वेळी लोणी खुर्दच्या महिलांनी मंत्री विखे पाटील पंढरपूर आणि तुळजापूर दर्शन घडविल्याबद्दल यांचा सत्कार केला. प्रारंभी गणेश आहेर यांनी लोणी खुर्द येथील सामाजिक उपक्रमाचा आढावा घेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.