नगर – सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महालपर्यंत सुमारे पावणे चार कोटी रुपये खर्चून केलेल्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या ठेकेदार ए. जी. वाबळे या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार केला असून लवकरच या ठेकेदाराला काळ्यात टाकण्यात येणार आहे.
सावेडी उपनगरातील मॉडेल रस्ता म्हणून तयार केलेल्या या रस्त्याची अवघ्या वर्षभरातच चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, काही ठिकाणी खडी सुटी होऊन विखुरली आहे. तब्बल 3.87 कोटी रुपयांचा हा रस्ता अल्पावधीतच खराब झाल्यामुळे महासभेत व स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने डांबरीकरणाचा तिसरा थर न टाकल्याचेहीसमोर आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दोन वेळा ठेकेदाराला नोटीस बजावून दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. रस्त्याचा दोषदायित्व कालावधी अद्यापही शिल्लक आहे. तरी ठेकेदार काम करत नसल्याने अखेर महापालिकेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
ठेकेदार संस्थेची अनामत रक्कम पंधरा लाख रुपये जप्त करण्यात येणार आहे. या रकमेतून रस्त्यावर डांबरीकरणाचा तिसरा थर टाकणार आहे. ही रक्कम कमी पडल्यास सदर ठेकेदाराच्या इतर कामातील अनामत रक्कम अथवा शिल्लक बिलातील रक्कमही जप्त करून ती वापरली जाईल. त्या ठेकेदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्याचा प्रस्तावही केल्याचे शहर अभियंता पारखे यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्यावर तिसरा थर टाकलेला नसतानाही ठेकेदाराचे अंतिम बिल काढण्यात आले. याचीही चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.