नगर – राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये संघर्ष सुरू असताना येथील भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वतःचे ओबीसी आरक्षण नाकारत सक्षम ओबीसींनी देखील आरक्षण नाकारून गरज असलेल्या ओबीसी आणि मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाची ज्याला गरज नाही, त्यांच्या आरक्षण काढून मराठा समाजातील गरजू व्यक्तींना आरक्षण द्यावे, अशी वेगळी मागणी जाधव यांनी केली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने जाधव यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांच्या या निर्णयाबाबत स्वागत करण्यात आले. आज आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये चांगलेच वादंग पेटले असताना आणि अनेक राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावरून विविध समाजामध्ये वादंग निर्माण होत आहे.
मात्र आता राजकीय नेत्यांची भूमिका काही असो मात्र प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावामध्ये सर्व समाज एकत्र राहत असल्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन लवकरच नगर शहरात आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक आयोजित करणार असल्याचे जाधव आणि सकल मराठा समाजाच्या झालेल्या चर्चेमध्ये ठरवण्यात आले आहे. कोणत्याही ऐतिहासिक निर्णयाची सुरुवात अहमदनगर शहरातून होत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे.त्यामुळे धनंजय जाधव आणि मराठा समाजाने एकत्रित येत हा आरक्षणाचा लढा पुढे नेण्याचा नगरी पॅटर्न हा वेगळाच आहे.