22 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अतिरिक्त पैशांची मागणी
सेंट मायकेल स्कूलवर कारवाईची मागणी
नगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील नारायण डोहो येथील सेंट मायकेल स्कूल प्रशासनाने आरटीईमध्ये सोडत पध्दतीने नंबर लागून देखील 22 विद्यार्थ्यांना पैश्याची मागणी करणाऱ्या व इतर कारणे दाखवून प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याच्या मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, गहिनीनाथ दरेकर, निलेश बांगरे, रामदास भोर, विशाल म्हस्के उपस्थित होते. या आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी विद्यार्थ्यांना त्वरीत प्रवेश देण्याबाबत प्राचार्यांना पत्राद्वारे कळविले आहे. तर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यास शाळा प्रशासनावर कारवाई केली जाइल असे सांगण्यात आले आहे.
सेंट मायकेल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांचा आरटीईच्या सोडतमध्ये नंबर लागला होता. शाळेच्या वतीने आरटीईअंतर्गत प्रवेश देत नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी पंचायत समितीमध्ये संपर्क केल्यानंतर शाळा प्रवेश देण्यास तयार झाली. मात्र, 46 हजार 700 रुपये शालेय शुल्कसह स्कूल बस, पुस्तके, गणवेशचे पैसे अतिरिक्त भरण्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पंचायत समितीमध्ये लेखी तक्रार केल्यानंतर शाळेची फी 16 हजार 700, स्कूल बसचे 18 हजार, पुस्तके व गणवेश 8 हजार असे 42 हजार 700 रुपये आरटीईमध्ये नंबर लागलेल्या 22 विद्यार्थ्यांच्या पालकांना भरण्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.