पारनेर (प्रतिनिधी) –पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी मुगाचे विक्रमी पेरणी केली होती. सुरुवातीला पाऊस झाल्यामुळे मुगाचे उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. मुगाला अनुकूल वातावरण असल्याने पीक जोमात आले. मात्र गेल्या आठवडाभर संततधार चाललेल्या पावसामुळे तोडणीस आलेल्या मुगाला मोड आले, तर काही मुगाच्या शेंगांना बुरशी लागून ते काळे पडले आहेत.
तालुक्यात पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर मृग नक्षत्रामध्ये वाटाणा व मूग हे पिके प्रामुख्याने घेतली जातात. यावर्षी वेळेत पाऊस झाल्यामुळे मुगाची पेर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली. सुरुवातीच्या काळात हवामान चांगले असल्याने मुगाला तवर व शेंगा चांगल्या झोंबल्या. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला विक्रमी मुगाचे उत्पादन मिळणार, असे वाटत होते. मात्र मुगाच्या शेंगा काढणीला आलेल्या असतानाच संततधार पाऊस सुरू झाला. पाऊस उघडेल, या आशेवर शेतकरी बसला. मात्र ढगाळ वातावरणामुळे व संततधार पावसामुळे या मुगाच्या शेंगांना कोंब फुटले.
काही शेंगांना बुरशी लागून दाणे काळे पडले. अशातही शेतकऱ्यांनी मुगाच्या शेंगा तोडणीस सुरुवात केली. पाऊस सुरू असतानाही शेतकरी मुगाच्या शेंगा तोडणीला लागला. त्यासाठी मजूर मिळेनासे झाले. जास्तीची मजुरी देऊन इतर गावांतून मजूर बोलून काही शेतकऱ्यांनी तोडणी केली. तोडलेला मूग एकत्रीत घरामध्ये साठवून ठेवला. ऊन नसल्याने त्या शेंगांनाही बुरशी लागून तो काळा पडला. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खराब मुगाला कवडीमोल बाजार भाव
<यावर्षी मुगाला एक हजार ते 6 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत आहे. पावसामुळे मुगाची माती झाली. मूग काळे पडले आहेत. त्यामुळे या मुगाला कवडीमोल बाजार मिळत आहे. त्यातून मजुरांवर खर्च केलेले पैसेही वसूल होतील की नाही, असा प्रश्न आहे.